Wound care Simplified

कापलंय , भाजलंय , खरचटलय ? 

कुठेही पडल्यानंतर एकतर आपल्याला मुका मार लागू शकतो, खरचटलं जाऊ शकतं किंवा कापलं जाऊ शकत.  

सर्वप्रथम , घाबरून जाऊ नका. मदतीसाठी (शक्य होईल तेवढ्या मोठ्याने)  हाक मारा.  

कापलं गेल्यानंतर काय कराल?

 1. कुठल्याही जागेवर कापलं गेल्यानंतर खूप रक्तस्त्राव होतो. तो थांबवण्यासाठी प्रयत्न करा. 
 2. कापलेल्या जागेवर कुठलीही पावडर , हळद अथवा  टूथपेस्ट भरू नका. मिळेल त्या स्वच्छ कपड्याच्या साहाय्याने त्या जागेवर दाब देऊन घट्ट बांधल्याने आणि हाताचा अथवा पायाचा भाग हृदयाच्या पातळीपेक्षा वर ठेवल्याने  तात्पुरत्या स्वरूपात रक्तस्त्राव आटोक्यात येतो. 
 3. त्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांकडे दाखवुन , त्वचेच्या आतमध्ये काही स्नायुबंध , मांसल भाग, नसा , यांना मार तर लागला नाहीये याची खात्री करून घ्यावी. आणि आवश्यकतेनुसार टाके टाकून घ्यावेत. टाक्यांबद्दल समज , गैरसमज आणि इतर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

खरचटलेल्या जखमेसाठी काय कराल?

 1. खरचटल्या मुळे  झालेली जखम खूप जास्त वेदनादायक असते कारण यात त्वचेचा वरचा पापुद्रा घासला गेल्याने नर्व्ह एंडिंग्स उघड्या पडतात आणि साध्या हवेमुळे किंवा पाण्यामुळेही तीव्र वेदना होतात.
 2. अश्या जखमा वेळीच जर चांगल्या पद्धतीने साफ केल्या गेल्या नाहीत तर त्या सावळतांना मातीचे सूक्ष्म कण तिथेच राहुन नंतर काळे डाग दिसतात. ( Posttraumatic Tattoing )
 3. शक्यतो भूल दिल्यानंतर असे मातीचे कण काढणे सोयीचे ठरते. व्यवस्थित रित्या साफ केल्यानंतर त्यावर न चिकटणारी प्राथमिक पट्टी ( Primary Dressing ) लावावी. ( ह्याला टुले ग्रास असे म्हटले जाते. ) आणि मग त्यावरून डॉक्टरांनी दिलेले मलम दिवसातून २ ते ३ वेळा लावावे. 
 4. साधारणतः ७ ते ८ दिवसात या जखमा सावळतात. सावळल्यानंतर कमीत कमी २ ते ३ महिने त्यांना सूर्यप्रकाशापासून वाचविणे फायद्याचे ठरते; अन्यथा नवीन आलेली त्वचा काळवटण्याची खूप दाट शक्यता असते. त्यासाठी बॅरिअर ( म्हणजे स्कार्फ बांधणे , टोपी घालणे ) किंवा सन स्क्रीन लोशन वापरलेले बरे. 

भाजले गेल्यानंतर काय कराल?

 1. सर्वप्रथम ज्या गोष्टीमुळे भाजले गेले आहे त्या गोष्टीवर नियंत्रण घ्या म्हणजे अजून इजा होणे टळेल. म्हणजे जर आग लागले असेल तर ती आटोक्यात आणा , गरम तेल सांडले गेले असेल तर ते पुसून घ्या, गरम पाण्यात हात गेला असेल तर तो बाजूला काढा , इत्यादी )
 2. भाजलेल्या भागाजवळची आभुषणे आणि कपडे काढून टाका. त्वचेला चिकटलेले कपडे घरी ओढण्याचा प्रयत्न करू नका. 
 3. कारण काहीही असो, भाजले गेल्यानंतर त्या जागेवरून खूप वेळ वाहते पाणी गेल्यास त्वचेची होणारी हानी कमी होते. त्यासाठी हात , पाय, नळाच्या पाण्याखाली काही मिनिटे ठेवल्यास योग्य. तसेच मर्यादित जागी भाजले गेल्यास बर्फ लावला तरीही असाच फायदा मिळतो. ( Pour water on Burns )
 4. जर चेहऱ्याचा कुठलाही भाग भाजला गेला असेल तर झोपून राहण्यापेक्षा बसून राहिलेले चांगले , याने सूज लवकर कमी व्हायला मदत होते.
 5. ह्या प्रथमोपचारानंतर लवकरात लवकर प्लास्टिक सर्जनना दाखवून घ्या. 
 6. साधारणतः १५ वर्षे वयाच्या पुढे १० ते १५  भाजलेल्या  रुग्णांना दवाखान्यात दाखल करायची गरज पडत नाही. परंतु, वय कमी असल्यास , जास्त खोलवर त्वचा भाजले गेली असल्यास , चेहऱ्याचा जास्त भाग किंवा जननेंद्रिय भाजले गेले असल्यास दवाखान्यात देखरेखीसाठी आणि पुढील उपचारासाठी दाखल करण्याची गरज असते. 

 

घरात किंवा भोवतालच्या परिसरात लहान मुलांना इजा होऊ नये म्हणून घ्यावयाची सर्वसाधारण काळजी :

 1. फर्निचर च्या कॉर्नर्स ला प्रोटेक्टिव्ह कुशन्स लावून घ्या.
 2. इलेक्ट्रिक सॉकेट्स चिकटपट्टीने कव्हर करून घ्या जेणेकरून मुलं त्यात हात घालणार नाहीत. सॉकेट्स जर जास्त खाली असतील तर इलेक्ट्रिशियन कडून ते निकामी करून घेतलेले फायद्याचे.
 3. बाल्कनी मधील संरक्षक ग्रिल्सची उंची वाढवून घ्या
 4. धारदार वस्तू जसे ब्लेड्स , चाकू , स्क्रू ड्राइव्हर , कात्री , इत्यादी मुलांच्या हाताला लागणार नाही याची काळजी घ्या.
 5. गरम वस्तू ( जसे भाजी , वरण , तळल्यानंतर तेल ) किचन टॉप च्या भिंतीजवळच्या बाजूला ठेवा म्हणजे मुलांचा हात तिथपर्यंत पोहचणार नाही.
 6. दरवाज्यांना पाठीमागे चांगल्या प्रतीचे स्टॊपर्स लावून घ्या म्हणजे हवेने दार आपोआप लागल्यास हाताची बोटं दरवाजा आणि चौकटीच्या मध्ये येऊन इजा होणे टळेल.