पायलोनिडल सायनस : माकडहाडाजवळील एक वेदनादायक आजार.

पायलोनिडल म्हणजे केसांचा गुच्छ , आणि सायनस म्हणजे शरीरातली अरुंद जागा

पायलोनिडल सायनस म्हणजे  त्वचेमध्ये तयार झालेला एक गळू (लहान पिशवी ) किंवा बोगदा आहे. हे जास्त करून माकडहाडाच्या सभोवतालच्या जागेमध्ये किंवा दोघे नितंबांच्या मधील जागेच्या सुरुवातीला होते. ह्या cyst (गळू) मध्ये केस आणि काही प्रमाणात द्रव पदार्थ आढळतो. तरुण पुरुषांमध्ये हि व्याधी जास्त प्रमाणात आढळते पण कुठलेही वय किंवा लिंग याला अपवाद नाही.

 

कारणे :

१. जास्त वेळ एकाच जागी बसण्याचा व्यवसाय उदा: ट्रक / बस चालक , सॉफ्टवेअर प्रोफेशनल्स , बँकर्स

२.  कमी हालचाल असणारी जीवनशैली (Sedentary lifestyle)

३. स्थूलपणा

४. माकडहाडाच्या सभोवतालच्या जागेला मार लागणे

५. नितंबांमधली फट जास्त खोलगट असणे

६. ह्या जागांवर कडक अथवा कुरळे केस असणे.

७. ती जागा वारंवार ओली होणे.

 

लक्षणे

१. वर नमूद केलेल्या जागेवर वेदना, लालसरपणा आणि सूज येणे

२. त्या जागेतून पिवळसर घाण वासाचे पाणी किंवा रक्तमिश्रित स्त्राव होणे.

३. ती जागा स्पर्श झाला तरी दुखणे

४. ताप येणे.

 

हि लक्षणे वारंवार होऊ शकतात. औषधांनी तात्पुरता आराम मिळू शकतो  पण परत त्रास उद्भवण्याची  दाट शक्यता असते.

 

अश्या रुग्णांना सायकल चालविणे , उठाबशा काढणे अशा प्रकारच्या हालचाली करताना त्रास होतो. कधी कधी थोडा वेळ बसल्यामुळे सुद्धा तीव्र वेदना जाणवू शकतात.

 

निदान:

विशिष्ट प्रकारची लक्षणे आणि बाधित जागेची बाह्यतपासणी ह्यावरून ह्या आजाराचे निदान लगेचच करता येते.

एका पेक्षा जास्त जागांमधून स्त्राव (discharge ) होत असल्यास Sinogram नावाची एक क्ष-किरण तपासणी करावी लागू शकते.

 

उपचार:

अँटिबायोटिक्स आणि वेदनाशामक औषधांमुळे जरी तात्पुरता आराम पडला तरी त्याने हा cyst सावळत नाही. त्यासाठी ऑपरेशन हाच अंतिम उपाय आहे.

पारंपरिक (Traditional) ऑपरेशन पद्धती मध्ये बाधित जागेवर चिरा करून त्यातली घाण आणि केस काढून ती साफ केली जाते आणि त्यामुळे झालेली खोलगट जखम नैसर्गिक पद्धतीने सावळू दिली जाते. सावळण्याला ३-८ आठवडे लागू शकतात आणि या कालावधीत रोज विशिष्ट पद्धतीने ड्रेसिंग करावी लागते, या सगळ्या गोष्टी त्रासदायक असतात.

 

प्लास्टिक सर्जन्सनि या प्रश्नांवर मात करून नवीन उपचार पद्धती अमलात आणली आहे. यामध्ये बाधित जागा सभोवतालच्या खराब झालेली  त्वचा  आणि त्याखालील चरबीसहित काढून टाकली जाते आणि त्यानंतर तयार झालेला खड्डा हा  बाजूची त्वचा आणि त्याखालील चरबी (Skin Flap ) विशिष्ट पद्धतीने फिरवून (ज्याला Transposition असे म्हणतात ) पूर्णपणे बंद केला जातो. कुठलीही जखम पाठीमागे न सोडता हे ऑपरेशन केल्याकारणाने दीर्घ काळ ड्रेसिंग करण्याची आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळते. साधारणतः एका आठवड्यानंतर पूर्ववत कामाला जाता येते.

 

Leave a Reply

Required fields are marked*